Film review 📅 2026-09-04 04:14:26 | Nyad 2023 (नायाद)
Nyad 2023   (नायाद)
यू ट्यूबवरच्या एका शॉर्ट मध्ये या सिनेमाची शिफारस ऐकली. गोष्ट इंटरेस्टिंग वाटली म्हणून बघितला. हा सत्य घटनेवर आधारित चरित्रपट आहे.
डायना नायाद या अमेरिकन जलतरणपटूने केलेल्या एका आगळ्या वेगळ्या धाडसी विक्रमाची ही गोष्ट आहे.
वयाच्या चौसष्टाव्या वर्षी क्युबा ते फ्लोरिडा असा 110 सागरी मैलांचा प्रवास सलग 33 तास पोहून तिने पूर्ण केला.
सांगताना मी एका वाक्यात हे सांगितले. यासाठी तिचे स्वतःचे परिश्रम,धाडस ,चिकाटी या सर्व गोष्टी होत्याच पण त्याचबरोबर तिची कोच असलेली मैत्रीण बॉनी व दिशादर्शक (navigator) जॉन,तिच्याबरोबर तिच्या मदतीसाठी बोटीने प्रवास करणारे जवळपास चाळीस सहकारी,या सगळ्यांचे मिळून ते टीमवर्क होते.
तीस वर्षांची असताना नायादने हा विक्रम करण्याचा पहिला प्रयत्न केलेला असतो.पण त्यात तिला अपयश आलेले असते.
त्यानंतर तीस वर्षे उलटून गेल्यावर म्हणजे वयाच्या साठीत ,लोकांच्या दृष्टीने निवृत्तीच्या वयात तिच्या मनात पुन्हा त्या स्वप्नाचा वेध घेण्याचे स्वप्न उमलते.आणि ती ध्यास घेऊन त्यासाठीची तयारी करू लागते.
तिची पार्टनर,मार्गदर्शक ,मैत्रीण सर्व काही
असलेली बॉनी तिला या स्वप्नपूर्तीसाठी साथ देण्याचे ठरवते.त्यात navigator असलेला जॉन जोडला जातो.इतर अनेक जण तिचा ध्यास पाहून मदतीसाठी तयार होतात.
आणि 2011 मध्ये साठीची नायाद जिद्दीने पाण्यात उतरते.
पहिला प्रयत्न दम न टिकल्यामुळे अपयशी ठरतो.
पुन्हा महिन्याभराने तयारी करून ती पाण्यात उतरते तर निम्मे अंतर पार केल्यावर जेलीफिश डंख मारतात.त्याच्या विषबाधेमुळे तिची शुद्ध हरपते. हाही प्रयत्न अपयशी ठरतो.
ती जिद्द आणि हट्ट सोडत नाही.पुन्हा प्रयत्न करते.
यावेळी समुद्रात वादळ आल्याने तिला अपयश येतं.
आता मात्र बॉनी आणि जॉन तिला हट्ट सोडण्याचा आग्रह करतात.आणि याउपर तू आमचे न ऐकता हट्ट धरलास तर आम्ही काही या मोहिमेत तुझ्याबरोबर सामील होणार नाही असं स्पष्ट बजावतात.
तिच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी तिने या दोघांना जणू गृहीत धरलेले असते. त्यांच्या वेळेची,श्रमाची,मदतीची तिला काही किंमत नाही असे विशेषतः जॉनला वाटू लागते.तिच्या स्पष्ट आणि फटकळ बोलण्यामुळे तो दुखावला गेलेला असतो. तुलनेने बॉनी समजूतदारपणे तिला समजून घेत असते.
नायाद या दोन जवळच्या माणसांच्या कानउघडणीमुळे अस्वस्थ होते आणि अंतर्मुख सुद्धा.तिच्या मनात अर्थातच तसे काही नसते.ती काही काळ जाऊ देते.मग दोघांची माफी मागते. मदतीचा आग्रह धरत नाही.
पण एकटीने पुढच्या मोहिमेची तयारी सुरू ठेवते.हे कळल्यावर खरे मित्र ,हितचिंतक असलेले ते दोघेही पुन्हा तिला साथ देण्यासाठी हजर होतात.मैत्री ही गोष्टच मोठी विलक्षण असते.
हे जग प्रेम आणि मैत्री या दोन भावनांमुळेच टिकून आहे असं मला नेहमी वाटतं... असो...
31 ऑगस्ट 2013...वय चौसष्ट ...पाचवा प्रयत्न...
मोहीम सुरू होते.यावेळी हवामान साथ देतं, जेलीफिशपासून बचाव करण्यासाठी तिने विशेष खबरदारी घेतलेली असते.शार्क मासे जवळ आले तर त्यांना इलेक्ट्रिक करंट सोडून दूर पळवण्यासाठी दोन तीन पाणबुडे सज्ज असतात...
ज्या भूमीवर पाऊल ठेवण्याचे स्वप्न असते त्या भूमीचे क्षितिज दृष्टिपथात येते.आता स्वप्न कवेत येण्यासाठी फक्त काही तास आणि काही मैल शिल्लक असतात.
तोच तिचे त्राण संपते,तिला भास होऊ लागतात,दिशा चुकू लागते,ती पाण्यात नुसतीच तरंगू लागते.
विक्रमासाठी ज्या मोहिमा होतात त्याचे काही नियम असतात.तिने कोणालाही स्पर्श करायचा नसतो.पाण्यातून बाहेर यायचे नसते...मग आता पाण्यात तोल हरवून बसलेल्या तिला कोण सावरणार? हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार की काय?
हे सगळे लक्षात आल्यावर तिची मैत्रीण बॉनी बोटीवरून पाण्यात उडी घेते.तिच्या जवळ जाऊन शब्दांनी तिला धीर देते.उमेद देते.आता एकच पाऊल ( एकच स्ट्रोक ) टाक...अजून एक... माझ्या सखे,आला बघ तुझ्या स्वप्नपूर्तीचा क्षण...अगदी थोडी कळ काढ...
या दिशेला वळ...अजून थोडा जोर...मग झालं..मग आले आपले ठिकाण...
तिच्या प्रेमळ,उबदार,प्रेरक शब्दांनी डायना नायाद भानावर येते..
दमलेले पण दमदार स्ट्रोक घेत ती फ्लोरिडाच्या
काठाला लागते.मोठा जनसमुदाय जल्लोष करत तिची वाट बघत असतो.
एकेक पाऊल विनाआधार, विनास्पर्श ओढत ओढत ती काठावर उभ्या असलेल्या बॉनीच्या कुशीत शिरते.ती ,बॉनी आणि जॉन एकमेकांना घट्ट मिठी मारतात.आणि ही चित्तथरारक मोहीम अखेर फत्ते होते.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ती म्हणते ,मी तुम्हाला फक्त तीन गोष्टी सांगू इच्छिते..
पहिली गोष्ट, never ever give up.. कधीही हार मानू नका...
दुसरी गोष्ट, you are never too old to chase your dreams.
स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी वयाचे बंधन नसते...
आणि तिसरी गोष्ट, it may looks like a solitary sport,but it takes a team.
ही मोहीम वैयक्तिक साहस वाटत असली तरी हे टीमवर्क आहे...
डायना नायादच्या भूतकाळात किंवा वैयक्तिक आयुष्यात दिग्दर्शक जास्त डोकावत नाही.तिचे भास, स्वप्न,संवाद यातून काही गोष्टी कळतात.जसे की तिच्या कोचने चौदा वर्षांची असताना तिच्यावर केलेला बलात्कार, तिचे वडील तिचे जैविक वडील नसणे इत्यादी... या ओरखड्यांचा तिच्या व्यक्तिमत्वावर काहीसा नकारात्मक परिणाम जरूर होतो. जसा की तिचा हट्ट,जिद्द, स्वकेंद्रित विचार...पण या गुणांचा ती तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोगच करून घेते. नायाद या ग्रीक शब्दाचा अर्थ म्हणे water nymph म्हणजे जलपरी असा आहे.म्हणून ती स्वतःसाठी डायनापेक्षा नायाद असे संबोधन पसंत करत असते.
सिनेमाच्या सुरुवातीला आणि शेवटी खऱ्या डायना नायाद आणि बॉनी यांचे फोटो,व्हिडिओ दाखवले आहेत.
डायना नायादची भूमिका Annette Bening हिने केली आहे.अतिशय संयत,नैसर्गिक अभिनय केला तिने.
विख्यात हॉलिवूड अभिनेत्री ज्युडी फॉस्टर हिने बॉनीची सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका स्वीकारली याचेच जास्त कौतुक वाटले.छानच केली ती तिने. विशेषतः शेवटी पाण्यात उडी मारून ती नायादला जो आणि जसा धीर देते, प्रोत्साहन देते तो प्रसंग अत्यंत भावपूर्ण झाला आहे.
हा सिनेमा दोघांनी मिळून दिग्दर्शित केला आहे. त्यांचाही हा पहिलाच प्रयत्न आहे.आणि तो चांगलाच यशस्वी झाला आहे.फार खर्च न करता ग्राफिक्सच्या मदतीने समुद्रातला थरार दाखवण्यात आला आहे.तरीही सिनेमाचा परिणाम उणावत नाही.
एक उत्तम प्रेरक सिनेमा बघितल्याचे समाधान आहेच पण खरी, निस्वार्थ मैत्री म्हणजे काय असते याचेही दर्शन घडणे हे माझ्यासाठी जास्त मनोज्ञ होते...
आमेन...
हा सिनेमा Netflix वर उपलब्ध आहे.
@ राजश्री बिराजदार