Film review 📅 2026-09-05 08:31:16 | The Kid with Bike
The Kid with Bike
शीर्षक सुचवते त्याप्रमाणे या सिनेमाची गोष्ट एका मुलाची आहे. बेल्जियम मध्ये घडणारी.
एका चिल्ड्रन होम मध्ये राहणारा बारा वर्षाचा मुलगा सिरिल अस्वस्थ आहे. आई नसलेल्या सिरिलला त्याच्या वडिलांनी त्याला इथे फक्त महिनाभर रहा असे सांगितलेले असते.आणि महिना होऊन गेला तरी त्यांचा पत्ता नसतो.त्याची लाडकी सायकल सुद्धा त्याच्याजवळ नसते. त्यामुळे तो बिथरला आहे.त्या वसतीगृहातून पळून तो त्याच्या घरी जातो.बघतो तर घर रिकामे.वडिलांचा पत्ता नाही. सायकलचा पत्ता नाही...तो निराश,हताश होतो.तोपर्यंत care taker त्याला परत न्यायला येतात.या झटापटीत तिथे उपस्थित असलेल्या समन्था नावाच्या तरुणीचा हात तो पकडतो...
त्याला नाईलाजाने वसतीगृहात जावेच लागते.
या प्रसंगाची साक्षीदार असलेली समन्था त्याच्याबद्दल चौकशी करते.तिला त्या मुलाबद्दल आस्था वाटते.त्याच्या सायकलचे वर्णन ऐकून ,त्याचे सायकलवरचे प्रेम बघून ती त्या सायकलचा शोध घेते.त्याच्या बापाने ज्या माणसाला सायकल विकलेली असते त्याच्याकडून ती सायकल परत विकत घेऊन समांथा सिरिलला नेऊन देते.सायकल बघून सिरिल खुश होतो.त्यालाही तिच्याबद्दल आपुलकी वाटू लागते. वसतीगृहात राहणाऱ्या मुलांना वीकएंड साठी स्थानिक पालक ( foster ) निवडण्याची मुभा असते. सिरिल तिला तू माझी तशी पालक होशील का अशी विचारणा करतो.ती लगेच हो म्हणते.
मग दर शनिवार रविवार तो तिच्या घरी जायला लागतो.ती हेअर ड्रेसर असते.तिला एक मित्र असतो.तिच्याकडे जायला लागल्यावर सिरिल तिच्या मागे लागून वडिलांचा शोध घ्यायला लावतो.त्याप्रमाणे ती त्यांना शोधून काढते.दोघे त्या इसमाला भेटायला जातात. सिरिलला बघून त्याला फारसा आनंद होत नाही. मुलाशी
उपऱ्यासारखे बोलून तो समांथाला सांगतो की त्याला पुन्हा इथे आणू नकोस.त्याला सांभाळणे मला इथून पुढे शक्य होणार नाही.
ती म्हणते ही गोष्ट तूच तुझ्या तोंडाने सांगितलीस तर बरे होईल. कोडगेपणाने तो सिरिलला तसे सांगतो. कोणता मुलगा यामुळे दुखावणार नाही ? सिरिल दुखावतो.हा अपमान,ही वंचना,हा प्रेमाचा अभाव,टाकून दिल्याची भावना त्या कोवळ्या मनाला कशी पेलणार ?ती शेवटी कृतीतूनच व्यक्त होणार...
सिरिल बेपर्वा, हट्टी,अबोल,हेकेखोर बनत जातो. समांथा त्याला समजून घेत राहते ,त्याची समजूत घालत राहते.
एकदा तिच्या मित्रालाही सिरिल उलटसुलट बोलतो. sorry म्हणायला तयार होत नाही.तरी समांथा त्याचीच बाजू घेते म्हणून तो तिला सोडून जातो.
त्या भागातल्या उनाड,गुंड प्रवृत्तीच्या मुलाच्या संगतीत तो येतो. त्याच्याबरोबर राहू नको असे सांगून सुद्धा ऐकत नाही.तो मुलगा काही दिवसांनी याला चोरी करायला शिकवतो आणि तसे करवून पण घेतो.त्यात सिरिल पकडला गेल्यावर तो गुंड मुलगा नामा निराळा होतो.
समांथा दंड भरून त्याची सुटका करून घेते.
त्या माणसाची माफी मागून आणि दंड भरून त्याची सुटका होते.आता त्याला काहीसे शहाणपण येते.तो तिच्या सांगण्याप्रमाणे वागू लागतो.
तरी मागे केलेल्या त्या कृत्याचे पडसाद उमटत राहणार असतात.चोरी करताना त्याने एक माणूस आणि त्याचा मुलगा अशा दोघांना प्रहार करून बेशुद्ध केलेले असते.त्यातला मुलगा एकदा सिरिलला रस्त्यात भेटतो,याला मारतो,पाठलाग करतो.त्यात सिरिल उंचावरून पडतो... निपचित...मग ते दोघे घाबरतात. ambulance ला बोलवायचा विचार करत असतात तर सिरिल उठून उभा राहतो..काही न बोलता,शांतपणे आपली सायकल घेऊन मार्गस्थ होतो.
तो वळणावर वळतो आणि सिनेमा संपतो.
काहीही विशेष थरार नसलेली ही गोष्ट मुलांच्या भावविश्वाचा तरल वेध घेते. आई वडील असून अनाथ आयुष्य जगणाऱ्या मुलांची संख्या परदेशात मोठी आहे.आपल्याकडेही गरीब पालकांच्या मुलांची अवस्था अशीच असते.
या मुलांना प्रेमाची भूक असते,योग्य मार्गदर्शनाची गरज असते,यांच्या बेताल वाटणाऱ्या वर्तनाकडे संयमाने ,सहानुभूतीने पाहण्याची गरज असते.
समांथा असा संयम, सहनशीलता दाखवते आणि सिरिलला योग्य वळणावर आणते. तिने जर त्याला सावरले नसते तर आणखी एक बालगुन्हेगार तयार झाला असता.
मुले कशा पद्धतीने,कशामुळे गुन्हेगारीकडे वळतात हे या सिनेमात कुठलाही मेलोड्रामा न करता सहजपणे दाखवले आहे.आणि त्याचे solution समांथाच्या वागण्यातून दाखवून दिले आहे.त्यामुळे प्रश्न आणि त्याचे उत्तर एकाचवेळी मिळून जाते.
सिरिलचे काम थॉमस डोरेट या मुलाने अप्रतिम केले आहे.मनस्वी, हट्टी,खटपट्या,तरीही निरागस सिरिल त्याने ज्या सहजतेने उभा केला आहे त्याला तोड नाही.त्याने एक हाती हा सिनेमा पेलला आहे.
समांथाची भूमिका सिसिल दि फ्रान्स हिने उत्तम साकारली आहे .
मूल म्हणजे मातीचा गोळा ,आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे हा सिनेमा...एवढेच...
आमेन...
@ राजश्री बिराजदार