पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-02 07:47:58 ✍️ प्राची परचुरे वैद्य - पुणे | श्रावण : निसर्गाचा हरित सोहळा
श्रावण आला, दाटून आले मेघ नभामध्ये,
धरती नटली हिरव्या शालूने
थेंबाथेंबातून जीवन हसले नव्याने,
सृष्टी खुलली आनंदाच्या पालवीने ||१||

डोंगर माथ्यावर शुभ्र धुक्याची चादर दाटे,
झरा गातो मधुर गाणे
दरीदरीत निनाद उठे जलतरंगांचा,
मनाला मिळते आनंदाचे नाणे ||२||

मोर पसरतो इंद्रधनुषी पिसांचा थाट,
रानभर उठती आनंदाचे सूर
कोकीळेच्या ताना झुलवितात वनराई,
गंधात विरघळती मधुर नूर ||३||

दवबिंदू चमकती पानांच्या टोकावर,
मोत्यांचा सजतो हार
पहाटकिरण अलगद अलगद स्पर्शून जाती,
उजळून निघतो सारा संसार ||४||

नदी गुणगुणते प्रवासाची गोड कहाणी,
किनाऱ्याला देते सहारा
लाटांवर नाचती सूर्यकिरणांची सोनपाखरे,
निसर्ग खुलवितो जीवनाचा किनारा ||५||

शेतकरी पेरतो आशेची सुवर्ण बीजे,
कपाळावर चमके घामाचे मोती
अंकुर डोलती धरतीच्या कुशीमध्ये,
स्वप्ने उमलती हिरव्या ज्योती ||६||

झाडे शिकविती निःस्वार्थ देण्याची रीत,
सावली ठरते प्रत्येकाची सखी.
फुले सांगती हसत जगण्याचे गुपित,
सुगंध बनतो जीवनाचा मुखी ||७||

श्रावण म्हणजे निसर्गाचा मंगल उत्सव,
प्रेमाचा उजळतो दीप
धरतीचे रक्षण करू या सर्वांनी मिळुनी,
तेव्हाच उजळेल भविष्याचा द्वीप ||८||

चिमणी, साळुंकी, बुलबुल गाती गोड ताना,
नभामध्ये घुमती मधुर गाणी
पानापानांवर उमटती थेंबांची अक्षरे,
धरती लिहिते हिरव्या स्वप्नांची कहाणी ||९||

श्रावण म्हणजे निसर्गाशी प्रेमाचा संवाद,
माणसाला लाभे जगण्याचा आधार
हिरवाई जपू या, वृक्ष लावू या सारे,
यातच दडला उद्याचा खरा संसार ||१०||

प्राची परचुरे वैद्य - पुणे
मो. नं. ९७६७६१३१४२