📅 2026-08-30 08:16:05 ✍️ डॉ.मंजुषा कुलकर्णी | पाणवठ्यावर
पाणवठ्यावर
पाणवठ्यावर जमलेल्या या
सख्या भगिनी माऊली
जरा मनाला रमवीत थांबती
घेत निवांत साऊली

गाळ मनाच्या खोल तळाशी
साठून जो राहिला
नाही कुणी हा कधीच कैसा
सांगा हो पाहिला

ऐका मैतरिणींनो टोचून
बोलणे ऐकून थकले
मन माझे हे आता बिचारे
ओझ्याने वाकले

तुंबून गेल्या पाण्याला जर
वाहण्या मार्ग न दिसला
आत साठल्या दुर्गंधीने
जीव विचित्रची फसला

इथे बोलुनी जरा सख्यांशी
मन हे मोकळे होई
पुन्हा नव्याने दुःख सोसण्या
काळीज धीर धराई

खळखळ अवखळ लाटा बोलती
ओघ पुढे चालणे
नका बायांनो जीवास तुम्ही
उगाच ग जाळणे

पापण्यातल्या नदीस जेंव्हा
येत पूर वाहतो
दुःख पूर जाऊ द्या वाहुनी
खूण चिखल राहतो

आठवांचाच चिखल राहतो
पुन्हा नव्याने ऋतू येऊ द्या
नवी ओढ त्या नदीला
पाऊस येण्या आधी आणिक

नंतर गाठा नदीला
दुःख तिचेही पाण्यासंगे
वाहत गाणे गाते
पहा सरिता सदैव ऐसी
सुखी शांतची राहते

रचना©®डॉ.मंजूषा कुलकर्णी