पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-02 06:54:37 ✍️ CA सुशील विचारे | आला श्रावण
लपंडाव वर्षा किरणांचा खेळत खेळत आला श्रावण
झर झर झर झरत्या शिरव्यांचा बरसत बरसत आला श्रावण

टिपऱ्या तडतडं जलबिंदूंच्या वाजवीत हा आला श्रावण
नाचे फुलवून मयूर पिसारा  सवे मयुरी आला श्रावण

धरा नेसली पैठणी हिरवी करण्या स्वागत आला श्रावण
चमके बुट्टी दवबिंदूची चमचम करता आला श्रावण

रविकिरणांचा कनकमुकुट हा डोंगरमाथी आला श्रावण
इंद्रधनूचे बांधून तोरण क्षितिजावरती आला श्रावण

शिवार डोले वाऱ्यावरती झुळूझुळू हिरवे आला श्रावण
अति आनंदे श्रावण गीता कृषिवल गाती आला श्रावण

गवतफुले नाजूक सुरंगी तृणी डोलती आला श्रावण
फुलपाखरे ही इवलीशी तया सांगती आला श्रावण

अल्लड अवखळ निर्झर दुडदुडु खळखळु लागे आला श्रावण
खुळावून धडपडून अवघ्या जगता सांगे आला श्रावण

समूह खगांचा नभी भरारे चित्कारुनिया आला श्रावण
श्रऊनी मग चित्कार तयांचे मोहरे सृष्टि आला श्रावण

तरुशिखरेही मिरविती गर्वे नवी पालवी आला श्रावण
विसावला गोवंश तरुतळी रवंथ करण्या आला श्रावण

नयनी श्रावण, हृदयी श्रावण श्वासातही मम आला श्रावण
श्रावण आला श्रावण आला श्रावण आला आला श्रावण

CA सुशील विचारे